लातूर - सर्व राज्यभरात २४ जून २०१८ पासून प्लास्टिक बंदी करण्यात आली. मोठा गाजवाजा करत लातूर शहरातही या मोहिमेला सुरुवात झाली होती. मात्र, काळाच्या ओघात या मोहिमेचा मनपाला विसर पडल्याचे दिसून येत आहे. दिव्याखाली अंधार याप्रमाणेच आता मनपाचे अधिकारी-कर्मचारीच प्लास्टिकचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. प्लास्टिक बंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनंतर 'ईटीव्ही भारत'ने याचा आढावा घेतला असून याबाबत मनपाची उदासिनता समोर आली आहे.
प्लास्टिक बंदीला सुरुवात होताच स्वछता विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला होता. याचा सर्वाधीक त्रास भाजी-विक्रेते, किराणा दुकानदार व लहान मोठ्या व्यापाऱ्यांनाच अधिक झाला. तोही केवळ 4 महिन्यापूरताच. कारण जूनमध्ये सुरू झालेली ही मोहीम सप्टेंबर 2018 मध्ये संपुष्टातही आली. या ४ महिन्याच्या कालावधीत 663 दुकानदारांची तपासणी केली असून यापैकी केवळ 58 दुकानदारांकडून 85 हजार दंड आकारण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात मनपाने अवैध विक्री होत असलेले 5.5 टन प्लास्टिक जप्त केल्याची नोंद मनपाच्या दप्तरी आहे. एवढेच नाहीतर कारवाई सुरू झाल्यापासून महिन्याकाठी 2 टन प्लास्टिक घटले असल्याचाही दावा मनपाकडून केला जात आहे.
मात्र, प्रत्यक्षात स्थिती वेगळीच असून बाजारपेठेत प्लास्टिकचा वापर सर्रास होत आहे. शिवाय प्लास्टिक निर्मिती कारखान्याकडे मनपाकडून दुर्लक्ष होत असून कागदोपत्री कारवाई दाखविण्यासाठी आम्हाला टार्गेट केला जात असल्याचा आरोप फळविक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांकडून होत आहे. मनपाची उदासीनता आणि कारवाईतील लहरीपणा यामुळे लातुरात प्लास्टिक बंदी आहे की नाही असा सवाल वर्षाभरानंतरही कायम आहे. मात्र , स्वच्छता विभागाच्या कारवाईतील लहरीपणाचा फटका मात्र काही निवडक व्यापाऱ्यांनाच होत आहे. त्यामुळे सरसकट प्लास्टिक बंदी करावी अन्यथा प्लास्टिक वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी लातूरकर करीत आहेत.