लातूर - निलंग्याहून अकोलाकडे निघालेल्या बसला औसा तालुक्यातील वाघोली पाटीजवळ ट्रकने धडक दिली. यात एका वृद्धाचा मृत्यू झाला असून इतर 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना लातूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. समोरासमोर धडक लागल्याने दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
रविवारी (दि. 10 जाने.) सकाळी 9 वाजता निलंगा-अकोला (एम.एच.बी.एल. 3973) ही बस निलंगा बस स्थानकातून मार्गस्थ झाली होती. औसा तालुक्यातील वाघोली पाटीजवळ मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने समोरासमोर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, बस रस्ता सोडून जवळ असलेल्या खड्ड्यात पडली. ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच औसा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
जखमींना लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. यामध्ये एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इतर 10 प्रवाशांवर उपचार सुरू आहेत.
बसमध्ये होते 14 प्रवासी, बस उलटली
निलंग्याहून अकोलाकडे निघालेल्या बसमध्ये 14 प्रवासी होते. यामधील 10 प्रवासी हे जखमी झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे औसा आगराचे आगरप्रमुख गायकवाड यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र विकास आघाडीची जनजागृती रॅली
हेही वाचा - लातूर; एकाच गावातील 350 कोंबड्या दगावल्या ; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण