लातूर - कोरोना योद्ध्यांबाबत सरकारकडून सहानुभूती दाखवण्याचा दिखाऊपणा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र परिचारिकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. परिचारिकांच्या मागण्या मान्य केल्यास त्याचा फायदा रुग्णांच्या सेवेत होईल व परिचारिकांची परवडही थांबेल, असे मत मांडत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने काळ्या फिती लावून लातूर शासकीय रुग्णलयात निदर्शने करण्यात आली.
गेल्या पाच महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या लढाईत डॉक्टर्स आणि परिचारिका या सर्वात पुढे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. असे असले तरी परिचरिकांची पदे पूर्ण क्षमतेने न भरल्याने कामाचा ताण वाढत आहे. आतापर्यंत अनेक वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, मनुष्यबळाचा अभाव असल्याने उपचार झाले की, लगेच या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांना सात दिवस क्वारंटाईनही राहता येत नाही.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे 51 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. वाढत्या कामाच्या ताणामुळे 12 जणांनी लगेच राजीनामाही दिला. अनेक पदे रिक्त असतानाही कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेणमूक करून वेळकाढूपणा केला जात आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीही केली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल खचत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून साप्ताहिक सुट्टी तर दूरच परंतु कोरोनवर मात केलेल्या परिचरिकांना सात दिवस क्वारंटाईनही केले जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची भरती, रखडलेला भत्ता, पदोन्नती यासारख्या विविध मागण्यांसाठी आज निदर्शने करण्यात आली.
आजपासून सात दिवस या परिचारिका काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहेत. या दरम्यान त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास 8 सप्टेंबर रोजी कामबंद आंदोलन व त्यानंतरही मागण्यांची पूर्तता झाली नाही तर बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी सर्वस्वी सरकार जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनाच्यावेळी संघटनेच्या सचिव सुमित्रा तोटे, राम सूर्यवंशी, राजेंद्र बहिर व सर्व परिचारिका उपस्थित होत्या.