नाशिक - मालेगाव तालुक्यातील कुख्यात गुंड ताहीर जमाल शाहीद उर्फ ताहीर डॉन ( वय 30 रा. गोल्डननगर, मालेगाव) याच्या मुसक्या आवळण्यास अखेर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. त्याच्याविरूध्द एकूण ३७ गुन्हे मालेगावच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल असून मागील २ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्याविरूध्द 'मोक्का'ची कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मालेगाव तालुक्यातील कुख्यात गुंड ताहिरला गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये त्याच्या साथीदारसंह अटक करण्यात आली आहे. ताहीरवर मालेगावच्या विविध पोलीस ठाण्यात दरोडा, घरफोडी, खूनाचा प्रयत्न, खंडणी वसुलीसारखे एकुण ३७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो मागील २ वर्षांपासून तो पोलिसांना चकवा देत होता, अखेर पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले असून त्याच्याविरूध्द 'मोक्का'ची कारवाई करणार असल्याचेही पोलीस अधीक्षक डॉ. सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा - माझी छाती फाडली तरी पवार साहेबच दिसतील - आमदार नरहरी झिरवाळ
ताहीर विरुद्ध मालेगावातील विविध पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याप्रकरणी पोलीस त्याचा तपास घेत होते. मात्र, ताहीरच्या ठावठिकाण्याबाबत पोलिसांना कुठलेही ठोस पुरावे मिळत नव्हते. मात्र, त्याचा शोध घेताना त्याच्या ७ साथीदारांना पोलिसांनी अटकेत घेतले. ताहिर परराज्यात वास्तव्य करत टोळीमार्फत संघटितरित्या मालेगाव तालुक्यात जबरी गुन्हे घडवित कायदा सुव्यवस्थेला धोका पोहचवित होता.
हेही वाचा - वाहनचालकानों सावधान ..! तुम्ही सीसीटीव्हीच्या नजरकैदेत
एका गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक केके पाटील, सहायक निरीक्षक संदीप दुनगहु, गोरक्षनाथ संवत्सकर, देविदास गोविंद, हेमंत गिलबिले, सचिन धारणकर, दिनेश पवार आदिंच्या पथकाने गुजरातमधील अहमदाबाद, सुरत या शहरांमध्ये धाव घेतली. या दोन्ही शहरांमध्ये ताहिरचा शोध घेत शिताफीने त्याला अहमदाबादमधून ताब्यात घेतले. तसेच त्याचे साथीदार अमीन अरमान शहा उर्फ अम्मु (२१) रा. सलीमनगर, मालेगाव, अतीक अमीन शेख (२४) रा. सुरत या दोघांनाही अटक केली. या तिघांनी छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल दरोड्याच्या गुन्ह्यासह अन्य गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा - विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका