लातूर - जिल्ह्यातल्या विनाअनुदानित शिक्षकांनी आज काम बंद करून मागण्या मान्य करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यलयावर चक्क लोटांगण मोर्चा काढला. विनाअनुदानित तुकड्यांना तात्काळ अनुदान द्या, अशी आंदोलनकर्त्या शिक्षकांची मागणी आहे. गेल्या ८ वर्षांपासून हे शिक्षक विनावेतन मुलांना शिकवत आहेत. यासंबंधी अनेक वेळा आंदोलन, मोर्चे काढण्यात आले. मात्र, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर लोटांगण घालून मागण्या मान्य करुन घेण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील शाळांमध्ये वाढलेल्या तुकड्यांना शासनाने ८ वर्षे उलटली तरीही अनुदान दिलेले नाही. त्यामुळे एकाच शाळेत पगार उचलणारे शिक्षक आणि पूर्ण वेळ काम करूनही अजिबात पगार न मिळणारे शिक्षक, अशी तफावत निर्माण झाली आहे. अनेक दिवसांपासून हा अन्याय शिक्षकांवर होत आहे. शासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही काहीच उपयोग होत नसल्याने सोमवारी जिल्ह्यातल्या शिक्षकांनी शाळा बंद पाडल्या आणि दंडवत मोर्चा काढत शिक्षण उपसंचालकांचे कार्यालय गाठले.
शिक्षक असे रस्त्यावर लोटांगण घालत असल्याने लोकही कुतूहलाने या मोर्चाकडे पाहत होते. जिल्ह्यात जवळपास २०० विनाअनुदानित तुकड्या असून त्यावर सुमारे सव्वाशे शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. अशा गांधीगिरीने मागण्या मांडण्यात आल्या असून आता तरी मान्य होतील, असा आशावाद या विनाअनुदानित शिक्षकांनी व्यक्त केला आहे.