लातूर- जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवशी ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढले. त्यामुळे, प्रशासनासह लोकप्रतिनिधी सतर्क झाले आहेत. कोरोनग्रस्त रुग्ण आढळून आले असले तरी सद्यास्थितीला जिल्ह्यातून एकाही मजुराचे स्थलांतर होणार नाही. या मजुरांची आहे त्या ठिकाणी सर्व सोय करण्याच्या सूचना आपण जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
शनिवारी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने राज्यमंत्री बनसोडे यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. शनिवारी परजिल्ह्यातील १२ जण निलंगा येथे दाखल झाले होते. यापैकी ८ जण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे, हे सर्वजण जिल्ह्यात दाखल कसे झाले?, जिल्ह्यात परराज्यातील अनेक नागरिक आहेत, त्यांचे काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र, जिल्ह्यातून सध्या एकही मजूर स्थलांतरित होणार नाही. इतर ठिकाणचे तब्बल ३ हजार नागरिक जिल्ह्यात विविध ठिकाणी आहेत. त्यांची सर्व सुविधा करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे, लॉकडाऊन काळात तरी त्यांचे स्थलांतर होणार नसल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
निलंगा येथे आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात १४ जण आले आहेत. त्यांचे विलगीकरण करून योग्य ती काळजी घेण्याच्या सूचनाही राज्यमंत्री बनसोडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. यावेळी बैठकीला पोलीस उपाधीक्षक हिम्मत जाधव यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शिवाय अधिकारी-कर्मचारी यांनी मुख्यालयातच राहून नागरिकांच्या समस्यांचे निवारण करणे आवश्यक असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले.
हेही वाचा- Coronavirus : 8 बाधित रूग्ण आढळल्यानंतर निलंगा 17 एप्रिलपर्यंत सील