लातूर - ग्रामीण भागात स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न गंभीर झाला आहे. रेणापूर तालुक्यातील फरदपूर गावात विशिष्ट समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अंत्यविधी कुठे करायचा यावरून वाद होतात. शुक्रवारी हा जातीय वाद टोकाला गेला. अखेर पोलीस प्रशासनासह तहसीलदारांना पाचारण करावे लागले. त्यानंतर तब्बल चार तासानंतर अंत्यविधीच्या जागेच्या वादावर तोडगा काढण्यात आला.
गुरूवारी सायंकाळी येथील मुद्रीकबाई नामदेव गायकवाड (७०) यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी जागेत अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच फरदपूर गावातील काही नागरिकांनी विरोध केला. त्या जागेत अंत्यविधी करायचा नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. मात्र, अशा दु:खद घटनेप्रसंगी वाद नको म्हणून जागा बदलून इतरत्र अंत्यविधीची तयारी करण्यात आली. तरीही गावातील जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांकडून अंत्यविधीला विरोध करण्यात आला.
सकाळी करण्यात येणारा अंत्यविधी दुपारपर्यंत रखडला होता. मुद्रीकबाई यांनी मरणोत्तर नेत्रदान केले असताना त्यांच्याबाबतीत असा प्रसंग घडला. अंत्यविधीच्या जागेवरून वाद निर्माण होताच रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच नायब तहसीलदार कराड यांनी मध्यस्थी केली. अखेर ४ तासानंतर अंत्यविधी करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
यापूर्वीही फरदपूर गावात तीन वेळा अंत्यविधीच्या गेवरून वादंग निर्माण झाले होते. विशिष्ट समाजासाठी स्मशानभूमी ठरवून देण्यात आली आहे. तसेच स्मशानभूमी बांधकामाचा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाकडे आहे. असे असताना विरोध होत असल्याने अंत्यविधीच्या जागेवरूनच संबंधितांना अधिक दु:ख सहन करावे लागत आहे. मुद्रीकबाई यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजात एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या वाट्याला मृत्यूनंतरही अवहेलना आल्याने सुजाण नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.