लातूर - निलंगा मतदार संघातील संपूर्ण मंडळात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी या भागाची पाहणी केली. तसेच सरसकट ५० हजार आणि बागायत शेतीला १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारला केली आहे. तालुक्यातील औराद शाहजनी, माने जवळगा, सावरी, तगरखेडा, वांजरखेडा, गुंजरगा, माकणी, हलगरा, हालसी या भागातील शेताची पाहणी त्यांनी केली.
पाहणी दौऱ्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या. यावेळी पंचनामे करण्यापेक्षा सरसकट नुकसानभरपाई तात्काळ द्यावी, अन्यथा मला वेगळ्या मार्गाने मागावे लागेल असा इशाराही आमदार निलंगेकर यांनी सरकारला दिला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फक्त बांद्र्याचे मुख्यमंत्री न रहाता संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
सरकारने प्रशासनाला योग्य त्या सुचना देऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळेल, अशा उपाययोजना कराव्यात व शेतकऱ्यांना जिरायतीसाठी एकरी ५० हजार व बागायत शेतीला एकरी १ लाख नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा शेतकरी या असंवेदनशील सरकारला माफ करणार नाहीत. शेतकऱ्यांना लॉटरी पध्दतीने बियाणे देण्याच्या सुचना महाविकास आघाडी सरकारने जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत, अशीही माहिती त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली. त्यावर तात्काळ प्रतिक्रिया देत आमदार निलंगेकरांनी तात्काळ जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे सर्व शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच अतिरिक्त बियाणे साठा करावा अशा सुचना देखील दिल्या. तसेच शेतकऱ्यांना धीर देत आमदार निलंगेकर यांनी बियाणे व खते उपलब्ध करून देण्याचे अश्वासन दिले.