लातूर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम आहे. शनिवारी एकाच दिवशी 29 रुग्णांची भर पडली आहे. शिवाय एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. एकाच दिवशी 29 रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. शनिवारी 211 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 309 एवढी झाली असून आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी 211 अहवालांपैकी 171 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह तर 9 अहवाल हे अनिर्णित आहेत. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये लातूर शहरातील 7 तर ग्रामीण मधील 2 अशा एकूण 9 रुग्णांचा समावेश आहे. अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथे 7, औसा तालुक्यातील भेटा येथे 6, सारोळा 2 तर बुधोडा येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. उदगीर येथील 4 जणांचे अहवाल हर पॉझिटिव्ह आहेत. आता शहरासह ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या ही वाढत आहे. त्यामुळे सध्या 94 जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णाची संख्या 197 आहे. शनिवारी देखील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.