लातूर- जिल्ह्यात दिवसाकाठी जिल्ह्यात 250 रुग्ण आढळून येत असल्याने रात्रीची संचारबंदी तर लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय पुणे, मुंबई या ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणीही जागोजागी केली जात आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 242 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र, धोका हा कायम होता. त्याचीच अनुभूती जिल्ह्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात पुन्हा रुग्ण संख्याही वाढू लागली आहे. प्रशासन स्थरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी दिवसाकाठी वाढत असलेले रुग्ण ही चिंतेची बाब आहे. गतआठवड्यात संख्या वाढत असातना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले होते. तर दिवसाला 250 रुग्ण आढळून येऊ लागल्याने रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे.
हेही वाचा-नाशकात कोरोनाचा युरोपियन स्ट्रेन आढळल्याची पालकमंत्री भुजबळांची माहिती
जिल्ह्यात 1 हजार 622 जणांवर उपचार सुरू
जिल्ह्यात आजतागायत 27 हजार 656 रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 622 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे 719 जणांना जीव गमवावा लागला आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे लातूर शहरासह जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आवाहन केले आहे.
हेही वाचा-कोरोना वाढला! अंधेरी, बोरिवली, कांदिवली, मुलुंड कोरोनाचे 'हॉटस्पॉट'
परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी
कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्रच वाढू लागल्याने पुणे, मुंबई येथील नागरिक पुन्हा गावाकडे परतू लागले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रवाशांची तपासणी शहरातील पाच नंबर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनपाच्यावतीने तपासणी केली जात आहे.