लातूर - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चाकूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने रास्ता रोको केला. ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जिल्हाभर आंदोलने, निदर्शने आणि उपोषणे होत आहेत. औसा येथे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु आहे तर दुसरीकडे शुक्रवारी चाकूर येथे शेतकऱ्यांची कर्जमाफी, खरिपातील नुकसानभरपाई यासाठी रास्ता रोको केला.
चाकूर तालुक्यात जुलैच्या शेवटी व ऑगस्टच्या सुरुवातीला मध्यम पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण आता पावसाने उघडीप दिली आहे. उगवलेली पिके कोमेजून जात आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. ज्या पेरण्या झालेल्या आहेत त्या पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे चालू वर्षातील खरीप हंगाम हातातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे. बळीराजा संकटात असताना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत केली जात नाही. शिवाय अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित आहेत. यासाठी शुक्रवारी चाकूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शासन विरोधी घोषणा देण्यात आल्या. तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, एकरी ५० हजार रुपयाचे अनूदान द्यावे. तसेच सरसकट कर्जमाफी द्यावी महामार्गात संपादीत जमिनीचा मोबदला तातडीने द्यावा. त्याचप्रमाणे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा. यासह अन्य मागण्या मांडल्या आहेत.
दरम्यान, लातूर-नांदेड मार्गावरील चाकूर येथे रास्ता रोको केल्याने काही काळ वाहतूकची कोंडी झाली होती.