लातूर - होळीनंतर आज (मंगळवार) धुलिवंदन या दिवशी मटन आणि चिकन खाणाऱ्या खवय्यांची संख्या मोठी असते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या भीतीने चिकनच्या दुकानांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. तर मटण खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली.
८० रुपये किलो चिकन असतानाही कोरोनाच्या भीतीने नागरिक ६०० रुपये किलोचे मटण घेणे पसंत करत आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरस आणि चिकन यांचा काडीमात्र सबंध नसताना, केवळ अफवांचा परिणाम काय होऊ शकतो, हे पहायला मिळत आहे.
हेही वाचा... कोरोना इफेक्ट : कोल्हापुरात चक्क कोंबड्यांचा सेल; 200 रुपयांना 'इतक्या' कोंबड्या
चिकनमुळे कोरोना व्हायरस होतो, अशा अफवांचे संदेश गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे चिकनची विक्री घटत आहे. आज धुलिवंदनच्या निमित्ताने मांसाहार करणाऱ्यांची संख्या अधिक असते. लातुरात मात्र 80 रुपये किलोचा भाव असतानाही चिकन सेंटर ओस पडली होती. तर मटण स्टॉलवर ग्राहकांची गर्दी होती.
चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होत नाही, हे पटवून देण्यासाठी आतापर्यंत लातुरात चिकन फेस्टिव्हल यांसारख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, देशात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये याबाबतची धास्ती अधिक वाढली आहे. याचा सर्वाधिक परिणाम चिकन विक्रेत्यावर झाला असल्याचे प्रखरतेने जाणवत आहे.