लातूर - लातूरमध्ये यंदाच्या बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समाज बांधव पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करीत होते. ईदगाह मैदानात एकीकडे नमाज अदा केली जात होती तर मैदानाच्या प्रवेशद्वारापासून मुस्लिम समाज बांधव हे निधी गोळा करीत होते. यावेळी सांगलीतील ३ गावे स्वच्छतेसाठी दत्तक घेत असल्याचेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.
मागील ४ दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी 'आम्ही लातूरकर' च्या माध्यमातून मदतीची मोहिम राबवली जात आहे. बकरी ईदच्या निमित्तानेही या भागच्या नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळपासून सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन मदत स्वरूपात निधीचे संकलन केले. शिवाय सर्वांनी या आवाहानाला प्रतिसाद देत सढळ हाताने मदत केली.
यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आर्थिक मदत तर आवश्यकच आहे. शिवाय येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी स्वयंसेवकांची गरज असल्याचे सांगितले. लातूरने सांगलीतील ३ गावच्या पुनर्वसनाची मोहीम हाती घेतली आहे. याकरिता मदत आणि स्वयंसेवकांची आवश्यकता असून जिल्हाधिकारी कार्यालयात नाव नोंदविण्याचे आवाहन केले.
ईदगाह मैदनात मुस्लिम बांधवांना शुभेच्छा आणि पुरग्रस्तांना मदतीचे आवाहन करण्याचे भोंगे लावण्यात आले. यामुळे आम्ही लातूरकर मोहिमेला गती मिळाली आहे. तसेच यावेळी २०१६ मध्ये रेल्वे पाणीपुरवठा करणाऱ्या सांगलीकरांची आठवण करून मदत केली जात होती. शिवाय मौलाना यांनीही पुरग्रस्त भागातील परस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात येण्यासाठी नमाज अदा केल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, सीईओ विपीन ईटनकर, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने उपस्थित होते.