लातूर - सोमवारचा एक दिवस वगळता दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवारी तर 19 नमुने तपासणीसाठी येथील प्रयोगशाळेत दाखल झाले होते, पैकी 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीला 66 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक रुग्ण संख्या ही उदगीर शहरात आहे.
सोमवारी 8 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. परजिल्ह्यातून नागरिकांची वर्दळ सुरू झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी लातूर शहरात एक तर तालुक्यातील मसला येथे एक रुग्ण आढळून आला. उदगीर शहरातील पाच जणांचे अहवाल प्रलंबित होते, त्यापैकी दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. निलंगा येथून 6 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. हे सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह असल्याने उदगीर पाठोपाठ निलंगा येथे अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे पूर्वी 56 रुग्णांवर उपचार सुरू होते, त्यामध्ये आता 10 रुग्णांची भर पडली आहे.
आतापर्यंत एकूण 105 रुग्ण आढळले होते, त्यापैकी 36 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 56 जणांवर उपचार सुरू आहेत तर तिघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. एकंदरीत वाढते रुग्ण ही चिंतेची बाब असून यातच परजिल्ह्यातून येणारा लोंढा कायम आहे, शिवाय सर्व बाजारपेठाही खुल्या करण्यात आल्या आहेत.