लातूर - जिल्ह्यातील जळकोटमध्ये एका जंगली माकडाने 100 पेक्षा जास्त जणांना चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे माकड गेल्या आठवडाभरापासून जळकोट शहरात वावरत आहे. चावा घेतलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे शहरात जंगली माकडाची दहशत निर्माण झाली आहे.
हेही वाचा - धर्म पाहून फूड डिलिव्हरी घेण्यास नकार देणाऱ्या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल
सध्या शाळेला सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणात लहान मुले खेळण्यासाठी रस्त्यावर अथवा शाळेच्या प्रांगणात वावरत आहेत. खेळत असलेल्या लहान लेकरांना चावण्याचा सपाटा या जंगली माकडाने सुरू केला आहे. एवढेच नाहीतर काही वृद्ध महिलांनाही या माकडाने चावा घेतला आहे.
हेही वाचा - जनतेच्या हितासाठी सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार - रोहित पवार
त्यामुळे या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी काही नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून माकडाचा बंदोबस्त करण्याची विनंती केली आहे. मात्र, वनविभागाकडून अद्याप कोणत्याच हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. माकडामुळे शहरात लहान मुलांना आणि वृद्ध महिलांना रस्त्याने वावरणेही जिकरीचे झाले आहे.
हेही वाचा - दिवाळीत घरी नेण्यासाठी काळजाच्या तुकड्याला 'आर्त' हाक, हजारो वृद्धांची दिवाळी होणार वृद्धाश्रमात
माकडाचा प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा आम्हाला प्रशासनाच्या विरोधात जळकोट शहर बंद करून माकडाच्या बंदोबस्तासाठी वेगळे पाऊल उचलावे लागतील, असा इशारा पीडित बालकांच्या पालकांनी दिलाय. या घटनेमुळे प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी किती गंभीर असल्याचे दिसत असल्याची चर्चा परिसरात आहे.