लातूर - मराठा आरक्षण आता राजकारण करण्याचा मुद्दा राहिला नाही; हा मुद्दा कायदेशीर आहे. मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी व विरोधक यांनी एकत्र येऊन न्यायालयीन लढा देणे आवश्यक आहे. मात्र, उपसमितीचे अध्यक्ष हे एकनाथ शिंदे राहिले असते तर, मागचा अनुभव कामी आला असता आणि आज निर्णय वेगळा असता, असे मत भाजपाचे औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले आहे. आंदोलकांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भावना व्यक्त केली.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर सबंध राज्यात आंदोलने सुरू आहेत. जिल्ह्यात आमदार-खासदार यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलने केली जात आहेत. आमदार अभिमन्यू पवार यांच्या घरासमोरही आंदोलन करण्यात आले. आंदोलकांची भावना योग्य आहेत. राज्य सरकारने आरक्षणाबाबत गांभीर्याने विचार केला नाही. त्यामुळेच समाजाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांनाच उपसमितीचे अध्यक्ष करायला पाहिजे होते. या बाबतीत त्यांचा अनुभव कामी आला असता. पण, अशोक चव्हाण यांना अध्यक्षपद देण्यात आले आणि सरकारचेही याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मात्र, आता ही राजकारण करण्याची वेळ नसून आरक्षणसंदर्भात सरकारसोबत विरोधी पक्षही राहणार असल्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने याबाबत एकत्र लढा राहणार असल्याचे आमदार पवार म्हणाले आहेत. आंदोलकांनी घरासमोर घंटानाद केल्यानंतर त्यांनी आंदोलकांची भेट घेतली होती.
हेही वाचा - लातूर जिल्ह्यात दोनऐवजी पाच ऑक्सिजनची निर्मिती प्रकल्पाची गरज