लातूर - यंदा जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळ नव्हे तर, अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे. गेल्या 15 दिवसांपासून सततचा होणारा पाऊस तसेच काही मंडळात झालेली अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उदगीर तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या शिवारातील पिकांची राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शनिवारी पाहणी केली. सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरवर्षी पावसाअभावी उत्पादन घटत असते. यंदा मात्र, परिस्थिती वेगळी असून सततच्या पावसामुळे पिके पाण्यात गेली आहेत. खरीप हंगामातील पीक काढणीच्यावेळी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 15 दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसामुळे तूर, मूग, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील 74 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे. शनिवारी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर तालुक्यातील धकनाळ, बोरगाव, नागलगाव, टाळली, सुमठाणा व कासराळ गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी केली. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे न भरून निघणारे नुकसान असल्याने सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
हेही वाचा-..तर उद्धव ठाकरे अन् शरद पवारांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करणार, पडळकरांचा इशारा
सोयाबीनला कोंब फुटले आहेत तर, ऊस जमिनीवरू भूईसपाट झाला आहे. त्यामुळे सरकार मदतीच्या दृष्टीने प्रयत्न करीतच आहे. पण, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याचे आवाहन राज्यमंत्री बनसोडे यांनी केले आहे. शेती शिवारातच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन अधिकाऱ्यांसमोरच त्याचे निवारण करण्यात आले.
हेही वाचा-मोल मजूरी करणाऱ्या "फेसाटी"कार नवनाथ गोरेंना भारती विद्यापीठाकडून नोकरी
नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. सरकार काय मदत जाहीर करणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. पीक पाहणीवेळी कृषी विभागाचे अधिकारी व महसूलचे कर्मचारी तसेच विमा कंपनीचे अधिकारीही उपस्थित होते.