लातूर - शहरात गेल्या आठ दिवसांपासून रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. रुग्णांची साखळी तोडण्यासाठी शहरात 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्याची मागणी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शहरात सध्या 77 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 45 कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. अनलॉक-1 सुरू झाल्यापासून शहरातील बाजारपेठा खुल्या आहेत. शिवाय, परजिल्ह्यातून आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करून ही साखळी तोडावी, अशी मागणी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्याकडे केली.
यासंदर्भात गुरुवारी महानगपालिकेत अधिकारी आणि नगरसेवक यांची बैठक पार पडली. शनिवारपासून पुढील 14 दिवस शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी पत्रकात करण्यात आली आहे. बीड आणि परभणी जिल्ह्यात यापूर्वीच लॉकडाऊन करण्यात आले आहे. शिवाय जिल्ह्यातील औसा आणि लातूर शहर हॉटस्पॉट आहे. त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी ही शिफारस करण्यात आली आहे. आता यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे.
मात्र, उद्यापासूनच लॉकडाऊन लागू होणार या अफवेने तळीरामांनी दारू दुकानासमोर गर्दी केली. याबाबत महापौर यांनी पत्रक काढून ही अफवा असल्याचे स्पष्ट केले.