लातूर- जन्मत:च आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या आणि दुर्धर आजाराने कायम जीवन-मरणाच्या गर्तेत असलेल्या सेवालयातील एड्सबाधित मुलांच्या जीवनात आज नवी पहाट उजाडली. सेवालायच्या इतिहासात प्रथमच येथील तीन जोडपे विवाहबंधनात अडकली असून त्यांच्या या सुखी- संसाराला आशीर्वाद देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने उपस्थिती दर्शीवली होती.
'हॅपी इंडियन व्हिलेज' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सेवालायात मंगळवारी रात्री सनईचे मंजुळ सूर घुमले. स्वतःचे आयुष्य या एचआयव्ही बाधितांच्या सेवेत समर्पित करून अविवाहित राहिलेले सेवालायचे संस्थापक प्रा. रवी बापटले आणि जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी कन्यादान केले.
सेवालायच्या प्रांगणात मदतीसाठी आणि वेगवेगळ्या उपक्रमांसाठी कायम मान्यवरांची रीघ असते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून येथील बालकांसह पदाधिकाऱ्यांची वेगळीच लगबग दिसून येत होती. कारण लहानपणापासून सेवालयात बागडलेले तिघेजण आज विवाह बंधनात अडकणार होते. याकरिता प्रा. रवी बापटले यांच्यासह समाजातून अनेक जण सरसावले होते. मंगळवारी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सेवालयाच्या प्रांगणात तीन जोडप्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. केवळ मदतीचीच भावना नाही तर जो तो घरातील शुभकार्य असल्याप्रमाणे राबत होता.
रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीमध्ये वधू- वरांनी प्रतिज्ञा घेऊन आयुष्यभर एकमेकास साथ देणार असल्याची प्रतिज्ञा घेतली. सेवालयाच्या प्रांगणात लहानाची मोठी झालेली ही जोडपी आता नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. उपस्थितांचे आशीर्वाद आणि सदिच्छा यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभून सुखी- संसार करतील, आशा अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.
परभणी एचएआरसी ट्रस्टतर्फे या वैवाहिक जोडप्यांना संसारूपयोगी साहित्य देण्यात आले. सामाजिक दायित्व म्हणून, अशा उपक्रमात या ट्रस्टचा कायम सहभाग राहिला आहे. यापूर्वीही येथील मुलांचा शैक्षणिक खर्च, आरोग्य, पुनर्वसन या करिता लोकसहभागातून मदत केली जात असल्याचे डॉ. पवन चांडक यांनी सांगितले. या विवाह सोहळ्यास अंनिसचे माधव बावगे, उपमहापौर देविदास काळे, प्रा. संजकुमार सोनवणे, वर्षा कलानी, कांतराव देशमुख, बसंती चांडक यांची उपस्थिती होती
प्रा. रवी बापटले यांच्या कार्याला 'सॅल्युट'
चांगल्या कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सेवालायच्या उभारणीसाठी प्रा. बापटले यांनी केलेला संघर्ष संबंध जिल्ह्याला माहिती आहे. त्यांच्या या कार्यामुळे एक पिढी उभारलेली आहे. स्वतःचे आयुष्य पणाला लावून समाजकार्य करणे हे मोठे धाडसाचे काम आहे. त्यांच्या या कार्याला माझा सॅल्युट आहे, असे म्हणात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
डोळ्यात अनंदाश्रू, मात्र आई वडिलांना मिस करते
एकीकडे आज स्वप्नात न पाहिलेला दिवस उजाडला आहे. याकरिता समाजातील प्रत्येक घटकाचे हात आमचे जीवन उभारण्यासाठी लागले आहेत. असे असतानादेखील आई- वडिलांना मिस करीत असल्याची प्रतिक्रिया नववधूंनी व्यक्त केल्या आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.