लातूर - 'हार के आगे जीत है' असे म्हणत औसा तालुक्यातील एक माजी सैनिक 1999 च्या निवडणुकीपासून आपले नशीब अजमावत आहेत. आतापर्यंत त्यांना केवळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळाले आहे. मात्र, त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत वाराणसीतून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले होते.
हेही वाचा - लातूर शहर मतदारसंघात भाजपची लढत काँग्रेसपेक्षा वंचितसोबत अधिक - शैलेश लाहोटी
मनोहर आनंदराव पाटील, असे या माजी सैनिकाचे नाव आहे. सातत्याने हार होत असली तरी संविधानाने दिलेल्या हक्क आपण बजावत आहोत, एक दिवस यश नक्कीच मिळणार, असा विश्वास पाटलांना आहे. मनोहरराव यांनी आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी औसा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गळ्यात महात्मा गांधींचा फोटो, हातामध्ये राष्ट्रध्वज आणि पाठीवर जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या ओवी, असे त्यांची ओळख आहे. मनोहरराव हे औसा तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी आहेत. वयाची पन्नाशी पार करत असताना देशातील कुटूंबशाही आणि देशाला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 1999 पूर्वी त्यांनी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपद मिळविले होते. घरातील अन्न-धान्य विकून त्यांनी गावाची सेवा केली होती. तर 1993 सालच्या भुकंपात त्यांनी कुटूंबीयाला गमावले आणि सबंध देशच आपले कुटूंब म्हणून ते राहत आहेत.
हेही वाचा - लातूरच्या तरुणाईचा सरकारकडून अपेक्षाभंग; बेरोजगारी, शैक्षणिक समस्या आजही कायम
मनोहर पाटील हे माजी सैनिक असल्याने मिळणाऱ्या पेन्शनमधून त्यांचा उदरनिर्वाह होतो. यापूर्वी त्यांनी विधानसभा आणि लोकसभा अशा मिळून 8 निवडणुका लढिवल्या आहेत. यामध्ये त्यांना यश आले नसले तरी 4 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात 2 हजार 200 मते मिळवली होती. सुर्योदय होताच गळ्यात महात्मा गांधींचा फोटो आणि हातामध्ये राष्ट्रध्वज घेऊन ते प्रचाराला बाहेर पडतात.
सध्या देशात घराणेशाही आणि एकाच पक्षाची लाट असली तरी भविष्यात जनतेच्या हिताचे आणि देश विकासाच्या मार्गावर येण्यासाठी माझ्यासारख्या उमेदवाराचीच गरज असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे सध्याच्या निवडणुकीत पक्षाशी एकनिष्ठता खुंटीला टांगून अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. तरी दुसरीकडे केवळ विचार आणि एकही पैसा खर्च न करता रिंगणात उतरलेले मनोहरराव हे परस्पर विरोधी टोक दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काहीही असो मात्र, मनोहरराव यांचा दृढसंकल्प वाखण्याजोगा असल्याची चर्चा परिसरात आहे.