लातूर : लॉकडाऊनचा तिसरा सोमवारपासून सुरु झाला. काल 4 मे पासून लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणत उद्योग-व्यवसायांसह उदगीर शहर वगळता दारूची दुकाने खुली करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. मात्र, दुकांनासमोर होणारी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा, तळीरामांत होणारी भांडण-तंटे पाहता जिल्हा प्रशासनाला हा निर्णय एका दिवसात मागे घ्यावा लागला आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील दारूची दुकाने ही बंद राहणार आहेत.
हेही वाचा... कर्नाटकात पहिल्याच दिवशी ४५ कोटींची दारू विक्री, ४० दिवसानंतर उघडली दुकाने
लातूर जिल्हा ऑरेंजझोनमध्ये आहे. त्यामुळे लहान- मोठे व्यवसाय आणि दारूची दुकाने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले होते. मात्र, दीड महिन्यापासून घशाला कोरड पडलेल्या तळीरामांनी दिवस उजडताच दारू दुकानासमोर गर्दी केली होती. सुरवातीचा काही काळ नागरिकांनी नियमांचे पालन केले मात्र, नंतर गर्दी वाढत गेली आणि ठिकठिकाणी गोंधळ सुरू झाला. अनेक वेळा पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला.
जिल्ह्यातील सर्व माहिती घेऊन रात्री उशिरा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय व्यवसायाईकांनीही नियमांचे पालन करूनच दुकाने उघडी ठेवावीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहनही केले आहे. त्यामुळे तळीरामांना दिलासा मिळाला पण तो एक दिवसापुरातच राहिला. त्यामुळे आता भविष्यात केव्हा दुकाने सुरू होतील. शिस्तीचे पालन केले असते, तर बरे झाले असते. यासारखी चर्चा आता लातुरात रंगू लागली आहे. मंगळवारी सकाळी शहरातील सर्व दुकाने बंद होती. सोमवारची गर्दी आणि आजचा शुकशुकाट हा विरोधाभास लातुरात पहायला मिळत आहे.