लातूर - गावातील कार्यकर्ता असो कि अन्य महत्वाचा व्यक्ती विलासराव देशमुख प्रत्येकाचा फोन उचलत असत. ही परंपरा त्यांच्या निधनाच्या ७ वर्षानंतर आजही कायम आहे. मात्र, आता ते फोनवर बोलत नाहीत तर त्यांची गाजलेली भाषणे चाहत्यांच्या कानावर पडतात. हो खरे आहे. विश्वास नसेल तर ९८२११२५००० या नंबरवर फोन करू शकता. एवढेच नाही तर त्यांचा आवाज ऐकण्यासाठी धीरज देशमुख हे देखील या नंबरवर फोन करतात, हे वास्तव आहे.
राजकीय नेते, मंत्री हे फोनच उचलत नसल्याची अनेकांची ओरड असते. मात्र, विलासराव देशमुख हे अर्ध्या रात्रीही फोन उचलतात हे सर्वांनाच माहिती होते. आणि त्यांची हीच बाब कायम ठेवण्याच्या उद्देशाने त्यांच्या कुटुंबीयांनी आजही त्यांचा मोबाईल नंबर सुरु ठेवला आहे. यामध्ये तंज्ञानाचा वापर करून व्हॉइस ऍक्टिव्हेशन म्हणून चालू ठेवण्यात आला आहे. त्यात केवळ गाजलेली काही मोजकी भाषणे ठेवण्यात आली आहेत.
अनेक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांच्या फोनबुकमध्ये आजही विलासराव देशमुख यांचा नंबर सेव्ह आहे. आणि त्यांना विलासरावांची आठवण आली की ते या नंबरवर फोन करतात. एका दिवसाला साधारणत: ४ ते ५ तास हा फोन सुरु असतो, असे धीरज देशमुख यांनी सांगितले आहे.
पुण्यतिथी किंवा निवडणुकांच्या काळात तर या फोन ओव्हरलोड होतो आणि सर्व्हर क्रॅशही होतो. असे असतानाही गेल्या ७ वर्षांपासून हा फोन चालूच आहे. त्यामुळे साहेब आपल्यात असल्याची भावना निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया धीरज देशमुख यांनी व्यक्त केली. एवढेच नाही तर जेव्हा साहेबांची आठवण येते त्यावेळी मी देखील तो फोन डायल करीत असल्याचे त्यांनी सांगितले.