लातूर - घरात दहा महिन्याचा मुलगा...त्यात सध्याच्या परस्थितीमुळे घरकामासाठी कोण कामवली बाई येण्यास धजावत नाही... घरचे सर्व कामे उरकायचे...मुलाला पतीजवळ द्यायचे आणि नेमून दिलेल्या जागेवर सकाळी ९ वाजता हजर राहायचे.. कोरोनाच्या या महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येकाला घराबाहेर पडू नका, असे आवाहन करायचे.. यावेळी स्वतःच्या आरोग्याची पर्वा नाही. मात्र, जनतेसाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे, त्यांनी हे ऐकाव...ही माफक अपेक्षा आहे.. अशी अपेक्षा वाहतूक पोलीस कर्मचारी सोनाली ढगे यांनी व्यक्त केलीय...
लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि पोलीस कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला. सध्याच्या कडक उन्हात काम करीत असताना महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे, असे असतानाही लातूरची जनता हा एक कुटुंबाचाच भाग असल्याचे समजत सोनाली ढगे या कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र, अनेकवेळा नागरिकांना सांगूनही घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी होत नाही.
सोनाली यांना दहा महिन्याचा प्रभास नावाचा मुलगा आहे. त्यांचे पती मुंबईला नोकरीवर आहेत. सध्या लॉकडाऊन असल्याने ते महिन्याभरापूर्वीच लातुरात आले. त्यामुळे ते मुलाचा सांभाळ करतात, तर सोनाली या लातुरातील जनतेच्या आरोग्यासाठी रस्त्यावर काम करीत आहेत. मुलगा लहान असल्याने सोनाली यांना अधून-मधून घरीही यावे लागते. आई दारात पाहताच मुलगा त्यांच्याकडे झेपावतो. पण, रस्त्यावर काम करताना अनेकांशी आलेला संपर्कामुळे सोनाली या सॅनिटायझरने हात धुवून, आंघोळ करूनच मुलाला कुशीत घेतात. गेल्या महिन्याभरापासून त्यांची हीच दिनचर्या सुरू आहे. त्यांना एकही दिवसाची सुट्टी नसल्याने मुलासाठी अधिकचा वेळ देता येत नाही.
इच्छा असूनही घरी राहता येत नाही. अनेकवेळा सांगूनही नागरिक घरी बसत नाहीत. मात्र, आम्ही लहान मुलांना सोडून तुमच्यासाठी रस्त्यावर आहोत, तर तुम्ही आमच्यासाठी घरात बसा, असे आवाहन सोनाली करतात. लातूरकर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देतील ही अपेक्षा.