लातूर- मागील आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गेल्या चार दिवसांपासून तापमानात झालेली वाढ यामुळे लातूरचे नागरिक त्रस्त आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात पारा 42 अंशावर गेला असून या उन्हाळ्यातील सर्वात अधिकच्या तापमानाची नोंद आजच्या दिवशी झाली आहे.
यंदा भर उन्हाळ्यातही ढगाळ वातावरण आणि अवकाळीने हजेरी लावल्याने उन्हाच्या झळाची तीव्रता तशी कमी होती. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन यामुळे देखील रस्त्यावर नागरिकांची गर्दी कमी होती. मात्र, आता वाढत्या उन्हाचा देखील परिणाम पाहवयास मिळत आहे.
भर उन्हात शेतकऱ्यांना शेती मशागतीची कामे करावी लागत आहेत, तर शहरामध्ये देखील वाढत्या उन्हामुळे नागरिकांची वर्दळ कमी होत आहे. चार दिवसांपासून जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. सोमवारी मात्र, हा पारा 42 अंशावर गेला. मे महिन्यातील उन्हाची दाहकता काय असते याची अनुभूती लातूरकर घेत आहेत. शिवाय अजून तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.