लातूर - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सरू झाली आहे. त्यामुळे उमेदवार प्रचारात दंग आहेत. मात्र, तरी प्रत्यक्षात जनतेच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'जनाधार मतदारांचा' यामधून जाणून घेत आहोत.... रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत समस्यांना बगल देऊन नेतेमंडळी राष्ट्रीय मुद्देच हाताळत आहेत. येथील समस्या या वेगळ्या असून आश्वासने आणि जाहीरनामे यापलीकडे सर्वसामान्य जनतेच्या पदरी काहीच पडलेले नसल्याचे मत औसा तालुक्यातील गुबाळ गावच्या नागरिकांनी व्यक्त केले.
हेही वाचा - शिवसेनेच्या २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचा राजीनामा; ऐन निवडणुकीत शिवसेनेला धक्का
निवडणुकांचा प्रचार आता मध्यवर्ती आला आहे. दावे- प्रतिदावे सुरू झाले असून मीच कसा श्रेष्ठ हे मतदारांना पटवून देण्यात उमेदवार दंग आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या आजही कायम आहेत. गुबाळ हे औसा मतदारसंघातील शेवटचे गाव आहे. गेल्या पाच वर्षात काही प्रमाणात कामे झाली असली तरी तरुण आणि शेतकरी वर्गांमध्ये नाराजीचा सूर कायम आहे. आजही पीकविमा रक्कम, अनुदान, कर्ज यासारखे प्रश्न कायम आहेत. तर, तरुणांच्या हाताला काम नसल्याने स्थलांतर दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना गावे ओस पडू लागली आहेत. सध्याच्या प्रचारात नागरिकांच्या जिव्हाळाचा प्रश्न बाजूला सारून ही निवडणूक राष्ट्रीय मुद्दे हाताळून काय साध्य केले जाणार? हा प्रश्न आजही कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारचे धोरण आणि सध्याच्या प्रचारातील मुद्दे याविषयी ग्रामस्थांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आगामी आमदाराबद्दल मतभिन्नता असली तरी गुबाळ ग्रामस्थांच्या अपेक्षा मात्र एकच आहेत, त्या म्हणजे मूलभूत सोई- सुविधांच्या.
हेही वाचा - उस्मानाबाद: बॅरिकेट्स तोडून कंटेनर घुसला तंबूत, पोलीस - होमगार्डचा जागेवरच मृत्यू
सध्याच्या प्रचारात देखील प्रत्यक्ष जनतेला ग्राह्य न धरता गावचे नेते, कार्यकर्ते यांच्यापर्यंतच प्रचार मर्यादित असल्याची भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे नाराजीचा सूर असलेले हे ग्रामस्थ कुणाला पसंती देणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.