लातूर - शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आता दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी अशी नियमावली जारी करण्यात आली असली तरी याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळेच शहरातील चौकाचौकात नागरिकांची गर्दी कायम असून सरकारने लादलेल्या नियमांचा कितपत उपयोग होईल याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
नागरीकांना कोरोनाचे गांभीर्य नाही
राज्यासह लातूर जिल्ह्यातही गेल्या 10 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्येसोबत मृत्यमुखी पडणाऱ्याचेही प्रमाण अधिक आहे. या वाढत्या कोरोनावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने जनता कर्फ्यु, सार्वजनिक गर्दी टाळण्यासाठी हॉटेल, पानटपरी, मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी शिवाय दिवसभर जमावबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, कोरोनाचे गांभीर्य ना नागरिकांना राहिले आहे ना प्रशासनाला. जमाबंदीचे आदेश लागू केल्यानंतरही आठवड्याच्या पहिल्या दिवशी शहरातील सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी कायम होती. तर गंजगोलाई, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी कामगारांनी गर्दी केली होती.
हेही वाचा - अनिल देशमुख शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्वर ओक'वर दाखल, अजित पवारही हजर
पोलीस बंदोबस्ताची गरज
हातावर पोट असणारे शेकडो कामगार हे कामाच्या शोधत शहरातील गंजगोलाई आणि छत्रपती शिवाजी चौक येथे दाखल होतात. सरकारच्या निर्बंधानंतर यावर अंकुश येईल असे वाटत होते. परंतु, परिस्थिती ही जैसें थे अशीच आहे. रस्त्यावरील नागरिकांची गर्दी कमी झाली असली तरी गांधी चौक, गंजगोलाई, छत्रपती शिवाजी चौक, पाच नंबर चौक या ठिकाणी ही गर्दी कायम आहे. शिवाय जागोजागी पोलीस बंदोबस्तही अद्याप तैनात करण्यात आलेला नाही. लातूर जिल्ह्यात दिवसाला 700 नवे रुग्ण समोर येत आहेत. रविवारी तर कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी विदारक अवस्था असताना नागरिकांना याचे गांभीर्य राहिलेले नाही तर प्रशासनही आवश्यक ते पाऊल उचलताना दिसत नाही. रात्रीच्या वेळी हॉटेल, बार याठिकाणी मनपाचे तसेच पोलीस प्रशासनाकडून धाड टाकली जात आहे. पण दिवसभराचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. ही कारवाई केवळ अर्थार्जनासाठी केली जात आहे काय? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचा तुटवडा
शहरात कोरोना रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजन सिलेंडरची मागणीही वाढली आहे. यासाठी आवश्यक असलेले लिक्विड हे मुंबई येथून पुरविले जात आहे. सध्या दिवसाला एक हजार सिलेंडरची मागणी आहे तर 700 सिलेंडरचा पुरवठा होत आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिली तर तुटवडा भासणारच आहे. खासगी उद्योगांसाठी एकूण साठ्याच्या 20 टक्के सिलेंडर दिले जात आहेत उर्वरित रुग्णांवर उपचारासाठी ठेवले जात आहेत.
कारवाईचा दिखावा
शासनाच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यावसायिक, उद्योजकांवर कारवाई केली जात असली तरी हा केवळ दिखावपणा आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. रात्रीच्या वेळी केवळ हॉटेल्स आणि बार चालकांना टार्गेट केले जात आहे. दिवसभर मात्र, सार्वजनिक ठिकाणी गर्दी कायम असल्याने सरकारने लागू दिलेल्या नियमावलीचा कोरोना रोखण्यासाठी काही उपयोग होईल का?अशी अवस्था आहे.
हेही वाचा - परमबीर सिंग यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी, १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश