लातूर - आमरण उपोषणदारम्यान अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे शिक्षकांना चांगलेच भोवले आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी १६ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ४ दिवस उपोषणानंतर पाचव्या दिवशी तुरुंगात जावे लागणार, या भीतीने सर्व शिक्षक हे फरार झाले आहेत.
योगवाशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या तीन विद्यालयातील १६ शिक्षक-शिक्षिकांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. संस्थाचालकाच्या अन्यायाविरोधात दाद मागूनही उपोषणाच्या चौथ्या दिवशीही त्यांच्या मागण्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे काही शिक्षिकांनी शिक्षणाधिकरी डॉ. वैशाली जामदार यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
शिक्षकांवर गुन्हे दाखल-
दरम्यान, तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्या शिक्षकांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी मागण्या पूर्ण न झाल्याने तनुजा गंभीरे आणि विरंगना चामे यांनी रॉकेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावर शिक्षणाधिकरी डॉ. वैशाली जामदार यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून विरंगना चामे, दिलीप बैले, तनुजा गंभीरे, सुमित्रा फरकांडे, प्रकाश राठोड, दीपक रेकुळवड, शीतल शिंदे, मंजुषा चिंचकर, प्रियांका रेड्डी, मुक्त इटकर, प्राजक्ता चेंगे, जितेंद्र बिरादार, पुष्पा खळदकर, सत्यवान कतेराव, जगदीश बडगिरे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपोषणाच्या ठिकाणाहून उपोषणकर्ते फरार झाले आहेत. या प्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अलापूरकर अधिक तपास करत आहेत. न्यायासाठी उपोषणाला बसलेल्या शिक्षकांवर 'भीक नको पण कुत्रा आवर' असेच म्हणायची वेळ आल्याची चर्चा सुरू आहे.