लातूर - गतवर्षीच्या तुलनेत लातूर विभागाचा निकाल 14 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, राज्यात 20 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले असून त्यामध्ये 16 विद्यार्थी हे लातूर विभागातील आहेत. त्यामुळे लातूर पटर्नला गतवैभव मिळवून देणारा निकाल असल्याचे मानले जात आहे. दहावी बोर्ड परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली असून विभागात पाहिले स्थान लातूरने राखले आहे. मात्र, राज्यातील 9 विभागीय मंडळात लातूरचा सातवा क्रमांक लागत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत लातूर विभागीय मंडळातून 78187 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 72.87 मुले तर 78.22 टक्के मुली आहेत. विभागातील तिन्हीही जिल्ह्यात मुलींची टक्केवारी ही मुलांपेक्षा अधिक आहे. विभागाचा सरासरी निकाल 72.87 टक्के एवढा लागला असून गतवर्षी 86 टक्के निकाल लागला होता. प्रश्नपत्रीकीचे बदलले स्वरूप आणि तोंडी परीक्षेचे गुण कमी केल्याने निकालावर परिणाम झाला असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष महेश करजगावकर सांगितले. इंग्रजी, गणितामध्ये विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले असून मराठी विषयालाच कमी गुण असल्याचे समोर आले आहे. लातूर विभागातील उस्मानाबाद जिल्ह्याचा 72.17, नांदेड 68.13 तर लातूर 78.66 असा सरासरी 72 87 टक्के विभागाचा निकाल आहे.
उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने रेखाटली सैराटची चित्रपटाची प्रेमकथा
लातूर विभागातील एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत चक्क सैराट चित्रपटातील प्रेमकथा मांडली आहे. अशा गैरमार्ग प्रकारची विविध 45 प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी हा एक असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांनी सांगितले. मात्र, हा विद्यार्थी कोण आणि कुठल्या जिल्ह्यातला आहे, हे सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले.