लातूर- कोरोनाच्या लढाईत शासकीय रुग्णालयातील परिचारिकांची भूमिका महत्वाची आहे. कोरोना योद्धा म्हणून त्यांचा गौरव होत असला तरी प्रत्यक्षात त्यांची अवहेलना सुरू आहे. म्हणून विविध मागण्या घेऊन या परिचारिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. त्यानुसार मागण्या मान्य न झाल्यास ७ दिवस काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोनाच्या लढाईत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका या सर्वात समोर येऊन लढत आहेत. असे असले तरी दुसरीकडे त्यांची अवहेलनाही सुरू आहे. परिचारिकांची पदे पूर्ण क्षमतेने न भरल्याने अनेकांवर कामाचा ताण वाढत आहे. रुग्णसेवा करीत असताना परिचारिकांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. मात्र, कोरोनावर मात करताच त्यांना कामावर हजर राहावे लागत आहे. यावर पार्याय म्हणून लातूर येथे ५१ कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. मात्र, अतिरिक्त कामाचा ताण आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता १२ जणांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे १०० टक्के पदभरती करावी, तसेच सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी परिचारिकांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
गेल्या ५ महिन्यापासून परिचारिकांना साप्ताहिक सुट्टी देण्यात आली नाही. शिवाय कोविड कक्षात कर्तव्य बजावल्यानंतर १४ दिवस अलग राहणे महत्वाचे आहे. मात्र, येथील परिचारिकांना तिसऱ्याच दिवशी कर्तव्य बजावे लागत आहे. शिवाय कोविड योद्धा म्हणून शाब्दिक कौतुक न करता केंद्र सारकारप्रमाणे जोखीम भत्ता देण्याची मागणी परिचारिकांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास ७ दिवस काळ्या फिती लावून आंदोलन आणि आठव्या दिवशी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
हेही वाचा- 'सिटी स्कॅन' शासकीय रुग्णालयात मोफत; मात्र खासगी रुग्णालयात सोयीनुसार आकारली जाते रक्कम