निलंगा (लातूर) - औराद शाहजनी गावातील शेतकऱ्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात कारवाई झाली नाही. तसेच, येथून जाणाऱ्या या शेतकऱ्याच्या मुलाला मारहाण करण्यात आली. यावरही पोलिसांनी कारवाई केली नाही, असे तक्रारदार शेतकरी भागवत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच, न्याय मिळण्याची मागणी केली आहे.
प्रकरण असे आहे -
हणमंतवाडी हलगरा येथील भीमाशंकर त्र्यंबक पाटील-शिंदे यांचे वडीलोपार्जित शेत आहे. त्यांनी येथील रस्त्यावर शेड मारून अतिक्रमण केले असून रस्ता अडवला आहे. औराद शाहजनी पोलीस आणि तहसिलदारांकडे याची लेखी तक्रार देण्यात आली आहे. मात्र तहसिल कार्यालय आणि पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे मदत मागितली असता त्यांनी पोलीस अधीक्षक व निलंगा तहसिलदारांना स्वतः पंचनामा करण्याचे आदेश दिले. महसुल विभागाचे हंगरगा शिरसी सज्जाचे मंडळअधिकारी व तलाठी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी, अर्जदार भागवत यांचे चुलते आत्माराम भिवराव पाटील, त्र्यंबक भिवराव पाटील, स्वतः अर्जदार भागवत, अर्जुन त्र्यंबक पाटील उपस्थित होते. या पंचनाम्यानंतर येथे रस्ता असल्याचा समोर आले. याची नोंद झाली. मात्र, त्र्यंबक पाटील यांनी पुन्हा अतिक्रमण केले, असे तक्रारदार शेतकरी भागवत पाटील यांनी म्हटले आहे. याविषयी पुन्हा तक्रार दाखल केली असता तहसिलदारांनी तक्रारदार भागवत आणि गैरअर्जदार भीमाशंकर यांना तहसिल कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. या वेळी भीमाशंकर गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश तहसिलदारांनी दोन वेळा काढले. मात्र, औराद शाहजनी पोलिसांनी यावर काहीही कारवाई केली नाही.
पालकमंत्र्यांच्या पत्राचा संदर्भ देत संबंधित पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांनी औराद शाहजनी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले होते. तसेच, अन्यायग्रस्त शेतकऱ्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यास सांगितले होते. मात्र, औराद शाहजणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी दखल घेतली नाही, असे शेतकरी भागवत पाटील यांचे म्हणणे आहे. तसेच, आपल्या मुलालाही अतिक्रमण करणाऱ्यांनी मारहाण केली. मात्र, यावरही कारवाई झाली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.