लातूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सबंध देशभरातील रेल्वेसेवा बंद होती. आता अनलॉकला सुरवात झाली असून सर्वकाही हळूहळू पूर्ववत होत आहे. त्याच अनुषंगाने लांबपल्ल्याच्या रेल्वे सुरू होत आहेत. 11 ऑक्टोबरला लातूर-मुंबई रेल्वे धावणार आहे. रेल्वे बोर्डाकडून तसे पत्रक जारी करण्यात आले आहे.
हेही वाचा - लातुरात ब्लू पँथरचे अर्धनग्न आंदोलन; हाथरसच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी
लॉकडाऊनच्या सहा महिन्यांच्या कालावधीत रेल्वे सेवा बंद राहिली होती. त्यामुळे लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या नागरिकांची अडचण झाली होती. मात्र, आता सर्व पूर्ववत करण्यास सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने रविवारपासून लातूर-मुंबई ही रेल्वेसेवा सुरू होत आहे. आठवड्यातून चार दिवस ही रेल्वे धावणार आहे. आतापर्यंत ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस बिदरपर्यंत जात होती. मात्र, आता ती बिदरपर्यंत जाणार नाही. तर, मुंबई-लातूर अशीच धावणार आहे. त्यामुळे लातूर आणि परिसरातील नागरिकांची पुणे, मुंबईला जाण्याची चिंता काही प्रमाणात का होईना, मिटली आहे.
हेही वाचा - मास्क न वापरण्याची लातूरकरांची कारणे ऐका; सोशल डिस्टन्सचे वाजले तीनतेरा!
दसरा, दिवाळीच्या तोंडावर ही रेल्वे सुरू झाल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. परंतु, प्रवासादरम्यान सरकारने घालून दिलेल्या निकषांचे पालन करणेही आवश्यक आहे. 11 ऑक्टोबरला ही रेल्वे मुंबईहून लातूरला येणार आहे. तर 12 ऑक्टोबर रोजी मुंबईकडे धावणार आहे.