लातूर - सध्या कोरोनाबद्दल अनेक अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, लातुरात एक वेगळीच अफवा पसरली आणि अनेकांनी सगळी रात्र रस्त्यावर जागून काढली. याचे कारण, ही अफवा लोकांच्या जीवन-मरणाशी निगडीत होती. 'एक मूल जन्माला आले आहे आणि जन्मल्यानंतर ते म्हणाले आहे की, जे झोपले ते कायमचे झोपणार आणि जे जागे आहेत, तेच जगणार' या एका अफवेमुळे अनेक गावातील ग्रामस्थांनी बुधावरची रात्र अक्षरशः जागून काढली.
हेही वाचा.... शेतकऱ्यांसाठी खूशखबर, लॉकडाऊन काळातही शहरात घेऊन जाऊ शकता शेतमाल
सोशल मीडियाचा कोण कसा वापर करेल, हे सांगता येत नाही. सध्या संपूर्ण देशभर कोरोना व्हायरसची दहशत आहे. त्यामुळे संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. शहरासह ग्रामीण भागात यामुळे कमालीची शांतता आहे. मात्र, या परिस्थितीतही एका अफवेमुळे दिवसभर शांत असलेल्या गावांमध्ये रात्रभर गोंगाट पहावयास मिळाला. कोणाला मित्रांचे फोन, तर कोणाला नातेवाईकांचे. त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला आणि अनेक गावातील ग्रामस्थ कुटुंबीयांना घेऊन रस्त्यावर आले.
यापूर्वीही २०१५ मध्ये अशीच अफवा पसरली होती. यावेळी मात्र, कोरोनाची धास्ती आणि ही अफवा त्यामुळे जिल्हा प्रशासनालाही याची दखल घ्यावी लागली. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन करावे लागले. सकाळी स्वतः ग्रामस्थच हा अफवेचा किस्सा मोठा रंगवून सांगत होते.