लातूर - कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याचे तपासणीचे अहवाल लातूर येथूनच दिले जात होते. पुणे येथून वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात हे अहवाल दाखल होत होते. आता कोरोनाची लसही प्रथम लातूर परिमंडळात दाखल होणार असून त्यानंतर उस्मानाबाद, बीड आणि नांदेड जिल्ह्यात पुरवठा केला जाणार आहे. याकरिता आवश्यक असलेली यंत्रणा सज्ज झाल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.
कोरोनामुळे सबंध जगभर घबराहटीचे वातावरण झाले होते. गेल्या नऊ महिन्यापासून हेच चित्र असल्याने प्रत्येकाला प्रतीक्षा होती ती कोरोनावरील लसीची. अखेर ही लस दृष्टीक्षेपात असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केल्यानंतर ही लस पुरवली कशी जाणार, याची उत्सुकता लागली आहे. लातूर हे परिमंडळाचे ठिकाण आहे. विभागीय स्तरावरून म्हणजे पुणे येथून ही लस लातूर येथे दाखल होणार तर येथून उस्मानाबाद, बीड आणि नांदेड जिल्ह्यात पुरवठा होणार आहे. याकरिता स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे, तर यामध्ये 40 क्युबिक मीटरचा वॉकिंग कूलर ज्याचे तापमान 2 ते 8 डिग्री सेंटिग्रेट असते. हा वॉकिंग कूलर या नव्या इमारतीमध्ये दाखल होणार आहे. याकरिता आवश्यक असलेला इलेक्ट्रीक वर्क तसेच जनरेटर याचीही सोय करण्यात आली आहे. डिफ्रिजर, एल. आर यासारखी उपकरणे ठेवण्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. विभागीय स्तरावरून येणारी वॅक्सिंग आवश्यक त्या देखरेखीखाली स्थानिक पातळीवर पोहचविण्याचे काम या परिमंडळाच्या ठिकाणाहून होणार आहे. परिमंडळातून जिल्ह्याच्या ठिकाणच्या यंत्रणेकडे ही लस सुपूर्द केली जाणार आहे. प्रवासाच्या दरम्यानही तापमान योग्य राहील, याची खबरदारी घेण्यात आली आहे. याकरिता आरोग्य विभागातील मुख्य औषध निर्माण अधिकारी दीपाली कुलकर्णी तसेच वैद्यकीय अभियंता कैलास तांबे हे परिश्रम घेत आहेत.
कोरोना योद्धांना प्राधान्य
कोरोना लसीचे वितरण हे वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे होणार आहे. यामध्ये आरोग्य अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांना प्राधान्य दिले जाणार आहे. शिवाय वयोवृद्ध नागरिक तसेच इतर आजारांनी त्रस्त असणाऱ्या नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. त्यासंबंधी एक पोर्टलही तयार करण्यात आले असून नाव नोंदणीनुसार पुरवठा केला जाणार आहे.
आरोग्य यंत्रणा लागली कामाला
आतापर्यंत कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचारी हे रात्रीचा दिवस करीत होते. आता लसीचा पुरवठा होणार असून याचे वितरणही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फतच होणार आहे. याकरिता विजेचे तसेच गरज पडल्यास जनरेटरची सोय करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागाच्या परिसरात एक स्वतंत्र इमारत उभारण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.