लातूर - लोकसभा मतदार संघाची मतमोजणी येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे पार पडणार आहे. त्या अनुषंगाने सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी 450 कर्मचारी कर्तव्य बजावणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. मतमोजणीच्या अनुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पत्रकार परिषद घेऊन मतमोजणीच्या प्रक्रिया आणि करण्यात आलेली तयारी यासंदर्भात माहिती दिली.
23 मे ला सकाळी 7 वाजल्यापासून पासून मतमोजणीची लगबग सुरू होणार आहे. सर्व उमेदवारांच्या समक्ष मतपत्रिका ठेवण्यात आलेला कक्ष उघडून टपाली मतपत्रिकांच्या पेट्या पोलीस बंदोबस्तात मतमोजणीच्या ठिकाणी घेऊन जाण्यात येणार आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात केली जाणार असून विधानसभा मतदार संघानुसार मतमोजणीची रचना करण्यात आलेली आहे. जागोजागी माहितीचे फलक लावण्यात आले आहेत. प्रत्येक मतदार संघासाठी 14 टेबल ठेवण्यात आले आहेत. सुरक्षतेच्या दृष्टीने स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून ही मतमोजणी प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी 450 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक निरीक्षक यांच्या समक्ष मतमोजणीला सुरवात केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक यांच्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांना मोबाईल मतमोजनी कक्षात घेऊन जाता येणार नसल्याचेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगीतले.
उमेदवाराने जर आक्षेप घेतला केला तर त्यामध्ये किती योग्यता आहे, त्यानुसार निर्णय घेऊन समाधान केले जाणार आहे. ही मतमोजणी प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यानी स्पष्ट केले.