लातूर - लॉकडाऊनच्या काळात ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी अनेकांचे मदतीचे हात सरसावले आहेत. पण या सामाजिक संस्था, संघटना फूड पॅकेटच्या माध्यमातून तात्पूरती मदत करीत आहेत. शिवाय दिवसातून दोन वेळा फूड पॅकेटचे वाटप होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जात नाही. त्यामुळे फूड पॅकेटचे वाटप न करता गरजवंतांना १४ दिवस पुरेल एवढे धान्य देण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
संचारबंदीच्या काळात समाजातील काही घटकांची उपासमार होत असल्याचे चित्र समोर आले होते. त्यानुसार अनेकांनी मदतीची तत्परता दाखवली. यामध्ये काही संस्थांनी किराणा साहित्य पुरवले तर काहींनी दोन वेळा पुरेल एवढे अन्न पुरविले. मात्र, दिवसातून दोन वेळा फूड पॅकेट देण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरल्यावर लॉकडाऊनचा उद्देशच साध्य होणार नाही. त्यामुळे अशा गरजवंतासाठी १४ दिवस पुरेल एवढे धान्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
सध्या जिल्ह्यातील ९५ टक्के नागरिक हे संचारबंदीच्या नियमांचे पालन करीत आहे. ज्यांच्याकडून उल्लंघन होत आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. शिवाय हॉस्टेल, क्लासेस तसेच कामासाठी परराज्यातील कामगार जिल्ह्यात अडकलेले आहेत. अशा ३ हजार नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा देण्याची जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची आहे. त्यामुळे मदत करू इच्छिणाऱ्या संस्थांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे धान्य सपूर्द केले, तरी मोठे योगदान राहणार आहे. फूड पॅकेट वाटप न करता धान्य स्वरुपातच मदत यापुढे केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांची गय केली नसल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
"वेळ पडली तर लष्कराचे पाचारण करण्यात येईल"
सध्या तरी जिल्ह्यात सर्वत्र शांतता आहे. सकाळ आणि संध्याकाळी काही प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. ३ हजार पोलीस बंदोबस्त तैनात आहे. असे असूनही गरज भासल्यास अहमदनगर येथे सैन्याची एक तुकडी तयारच आहे. आगामी १२ दिवसांत शांतता कायम राखण्यासाठी गरज पडली तर त्यांना पाचारण करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.