लातूर - कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक होत असताना, गेल्या तीन दिवसांपासून बाजार समिती बंद आहे. व्यापारी आणि बाजार समितीने हमाल आणि मापाड्यांची मजुरी वाढवावी, अशी मागणी मजूर संघटनेने केली आहे. मात्र मागणीवर समाधानकारक तोडगा निघत नसल्याने बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय मजूर संघटनेकडून घेण्यात आला आहे. मात्र यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
खरीपात सोयाबीनचे नुकसान होऊन देखील उस्मानाबाद, बीड तसेच कर्नाटक या भागातून सोयाबीनची आवक होत होती. मात्र, दर तीन वर्षांनी हमाल-मापाडी यांच्या मजुरीत वाढ केली जात असते. यंदा हा निर्णय झालेला नाही. यासंदर्भात मजूर संघटना, व्यापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्यात आतापर्यंत दोन वेळा बैठका पार पडल्या आहेत. परंतु मजुरी दर वाढीबाबत निर्णय झालेला नाही, शेतकऱ्यांकडून येणारा शेतीमाल उतरून घेणे शिवाय तो खरेदीदारापर्यंत पोहोचवणाऱ्या हमालांच्या मजुरीत वाढ करावी अशी मागणी मजूर संघटनेने केली होती. मात्र यावर तोडगा निघत नसल्याने अखेर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. सोयाबीनला यंदा 4 हजारांपेक्षा अधिक दर आहे. मात्र बाजार समिती बंद असल्यामुळे त्यांना आपला माल विकण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
मजुरांवर उपासमारीची वेळ
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 500हून अधिक व्यापारी तर 1800 मजूर आहेत. गेल्या तीन दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. मजुरी केली तरच उदरनिर्वाह होतो, अशी या मजुरांची अवस्था आहे. मात्र मजुरीत वाढ करण्याचा निर्णय होत नसल्याने, या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या बाजार समितीमधून दिवसाला 50 हजार क्विंटलपेक्षा अधिक धान्याची आवक होते. यातून दरदिवशी या मजूरांना प्रत्येकी 500 ते 600 रुपये मिळतात.
बाजार समितीमध्ये शुकशुकाट
दिवाळीपूर्वी बाजार समितीमध्ये 1 लाख क्विंटल सोयाबीनची आवक होत होती. परंतु, दिवाळी नंतर आवक घटली असली तरी दिवसाकाठी 50 हजार क्विंटल आवक कायम होती. पण बाजार समिती बंद असल्याने शुकशुकाट आहे. जागोजागी मजूर हे बसून आहेत. मजुरीसंदर्भात लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा या मजुरांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - केंद्र सरकारने पीक विम्याचा हिस्सा कमी केल्याने शेतकऱ्यांवर अन्याय; कृषीमंत्री दादा भुसेंचा आरोप
हेही वाचा - फुकट मिळालेल्या सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, चंद्रकांत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया