लातूर - अनेक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेना यांच्यावतीने सोमवारी लातुरात महाधरणे आंदोलन करण्यात आले. शहरातील महात्मा गांधी चौकात लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटले होते. गेल्या अनेक दिवसांपासून शासन दरबारी पाठपुरावा करूनही आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आले.
हेही वाचा... अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 'मराठी भाषा सक्ती' विधेयक; सत्ताधारी-विरोधकांचे होणार एकमत
मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अ.ब.क.ड. या तत्वानुसार आरक्षण मिळाले पाहिजे, हि लहुजी सेनेची मुख्य मागणी असल्याचे आंदोलकांनी सांगितले. त्याशिवाय चाकूर येथील अण्णाभाऊ साठे चौकाची तोडफोड करून वृद्धांना मारहाण करणाऱ्या जातियवादी गावगुंडांना अटक करावी. अकोला जिल्ह्यात मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. नांदेड येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकांवर तात्काळ कारवाई करावी. कळंब येथील मनोज झोंबाडेच्या मारेकरांना फाशी देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे महाधरणे आंदोलन करण्यात आले होते.
यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत आहे. त्यामुळे अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याची मागणीही लहुजी सेनेच्या जिल्हाध्यक्षा मायाताई लोंढे यांनी केली. यावेळी सेनेच्या पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा... धावत्या रिक्षात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमाच्या तावडीतून सुटकेसाठी पीडितेची उडी