लातूर - शहरातील लेबर कॉलनी येथे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. रुग्ण आढळून आलेला परिसर हा सील करण्यात आला असून अत्यावश्यक सुविधा मनपाच्यावतीने पुरवल्या जात आहेत. शिवाय रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने देखील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
बिदरहून परतलेल्या एका 65 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार त्या रुग्णाची पार्श्वभूमी, तो कुठून आला कुणाच्या संपर्कात होता, याची माहिती मनपाच्यावतीने घेण्यात आली असून नमुने तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आलेत. 14 दिवसासाठी लेबर कॉलनी परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील लहान- मोठे व्यवसाय तर बंदच राहणार आहेत. शिवाय नागिरकांनी विनाकारण घराबाहेर येण्यास परवानगी नाही. अत्यावश्यक सेवा मनपाच्या कर्मचाऱ्यांकडून पुरवण्यात येणार आहेत.
शुक्रवारी या रुग्णाला कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच मनपाने हे पाऊल उचलले आहे. शहरातील हा एकमेव परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये असणार आहे. नाकाचे ऑपरेशन करण्यासाठी सदरील व्यक्ती हा आठ दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. तपासणी दरम्यान त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यानंतर हा परिसराचे निर्जंतुकिकरण केले जात असून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या ही 39 वर पोहोचली असून 36 जणांना उपचार करून सोडण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे वाढत्या रुग्णांवर अंकुश लावण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासमोर आहे. सदरील व्यक्ती हा महापौर यांच्याच प्रभागतला असून सध्या येथील 100 मीटर अंतरावरचा परिसर सील करण्यात आल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले आहे.