लातूर - ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे यांचा मुलगा विश्वजीत भिसेवर रेणापूर येथे चाकूने हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला शेतीच्या वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यानंतर त्याला उपचारासाठी लातूर शहरातील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
नांगरणी चालू असल्याने विश्वजीत त्र्यंबक भिसे हा सोमवारी रात्री १० वाजच्या सुमारास शेताची पाहणी करण्यासाठी गेला होता. त्याचवेळी शेतीच्या असलेल्या वादामधून हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरामधील सर्व आरोपी भिसे कुटुंबातील असल्याचे बोलले जात आहे.
लातूर शहरात आणि परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत आहे. भावडासिंग जुन्नी यांचा झालेला खून आणि आज एका आमदाराच्या मुलावर चाकू हल्ला यामुळे लातूर जिल्ह्यात भितीदायक वातावरण तयार झाले आहे. यामध्ये रेणापूर पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे, तर एक जण फरार झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.