लातूर - औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस स्टेशनने 'मास्कसह पोलीस आपल्या दारी' हा अनोखा उपक्रम राबवला आहे. लामजना ग्रामपंचायत व ॲन्टी कोरोना फोर्सच्या माध्यमातून परिसरातील जनतेत जनजागृती करुन घरोघरी मास्कचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. पोलीस प्रशासनाकडूनही विविध पातळीवर प्रयत्न होत आहेत. जिल्हा पोलीस दलातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर किल्लारी पोलीस स्टेशनने लामजना ग्रामपंचायत व अॅन्टी कोरोना फोर्स यांच्या मदतीने 'मास्कसह पोलीस आपल्या दारी' उपक्रम राबवला आहे. यावेळी पोलिसांनी घरोघरी जाऊन नागरिकांना कोरोना संसर्गाचे गांभीर्य समजावून विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत मास्कचे वाटप केले.
यामध्ये किल्लारी पोलीस स्टशेनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे, सचीन उस्तुरगे, सरपंच फुलारी, उपसरपंच बालाजी पाटील, महेश बनसोडे यांच्यासह पोलीस कर्मचारी व ॲन्टी कोरोना फोर्सच्या कर्मचा-यांनी सहभाग घेतला.