लातूर - 'पुरोगामी भारतामध्ये आजही मनुस्मृतीला पाठबळ दिले जात आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी दिवसेंदिवस याचा वापर वाढत असून भाजप संविधानाला विरोध करत आहे. हे देशाच्या एकात्मतेसाठी धोकेदायक आहे. म्हणून भाजपला हद्दपार करा', असे वक्तव्य आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केले आहे. उदगीर येथे 'संविधान सन्मान यात्रे'निमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी जिग्नेश मेवाणी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. आगामी विधानसभा निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवून देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या 5 वर्षांत निवडणुकांना जातीय रंग दिला जात असून मोदी सरकार मनुस्मृतीला पाठबळ देत असल्याचा आरोप मेवाणी यांनी केला आहे. तसेच, सरकार संविधानविरोधी भूमिका घेत असल्यामुळे हुकूमशाही पद्धत भारतात रूजत असल्याचेही ते म्हणाले.
उदगीर मतदार संघातून निवृत्ती सांगवे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे यावेळी मेवाणी यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय दलित अधिकार मंचाच्या वतीने आयोजित संविधान सन्मान यात्रेला मराठवाड्यात प्रारंभ झाला. पावसामुळे काही काळ सभेत व्यत्यय निर्माण झाला होता. या सभेला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.