लातूर- शासकीय सेवेत काम केल्यानंतर सेवा निवृत्तीचा कार्यक्रम एक औपचारिकता मानली जाते. मात्र, लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम अविस्मरणीय झाला आहे. त्यांच्या कामाच्या अखेरच्या दिवशी खुर्चीपर्यंत रेड कार्पेट आणि स्वागताला स्वतः जिल्हाधिकारी जी. श्रीकांत उपस्थित होते. यामुळे सेवानिवृत्त झालेल्या जब्बार अली खान पठाण यांच्यासाठी हा दिवस अविस्मरणीय राहणार झाला.
जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्रमाचे नियोजन असो महत्वाच्या बैठका असो याबाबत पडद्यामागची भूमिका बाजवणारे जब्बार अली खान हे शासकीय सेवेतील अखेरचा दिवस म्हणून कार्यालयात आले होते. मात्र, मंगळवारचे कार्यालयातील चित्र हे त्यांच्यासाठी वेगळेच होते. त्यांच्या टेबलपर्यंत रेडकार्पेट अंतरण्यात आले होते. शिवाय येणारा प्रत्येकजण पुष्पहार घेऊन येत होता. नोकारीच्या शेवटच्या दिवशी अनेक आठवणी आणि जड अंतकरणाने नोकारदार निरोप घेत असतो. मात्र, या दिवसाचीही आठवण न होऊ देता जब्बार अली खान पठाण यांना निरोप देण्यात आला.
सध्या कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत असा आगळा- वेगळा कार्यक्रम राबविला जाईल याची कल्पनाही कुणाला नव्हती. मात्र, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून हा वेगळा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. गेल्या 35 वर्षांपासून जब्बार खान-पठाण यांनी विविध कार्यालयात कर्तव्य बजावले आहे. आपली कार्यकिर्द कायम आठवणीत राहावी याकरिता हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. हे सर्व माझ्यासाठी अनपेक्षित होते. हा समारंभ दुःखद असला तरी जीवनात कायम स्मरणात राहील, असे जब्बार अली खान-पठाण यांनी सांगितले.