लातूर - उदगीर येथील पशुवैद्यकीय कॉलेज परिसरातील शंभर एकर जमिन देवणी गोवंश संवर्धन करण्यासाठी उपलब्ध केली जाईल, अशी माहिती पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. राज्यामंत्रीपदी निवड झाल्यानंतर जळकोटमध्ये त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा - आंबेगावात अज्ञात चोरट्यांनी पळवली लाखांची बैलजोडी, निलंगा पोलिसात गुन्हा दाखल
देवणी गोवंश हे आपले भूषण असून 1952 पासून 27 वेळा देवणी गोवंशाला पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या भागातील शेतकरी पशूधनाचा चांगला सांभाळ करतात त्यासाठी शासनाकडूनही मदत केली जाणार असल्याचे बनसोडे म्हणाले. लातूरच्या जळकोट आणि उदगीर तालुक्यात 1952 पासून देवणी गोवंशाचे संगोपन केले जाते. आजही या परिसरात शेकडो पशूपालक देवणी जातीच्या गाई, वळूंचे पालन करीत आहेत. या जातीच्या गाई, वळू राज्यातल्या प्रत्येक पशु प्रदर्शनात लक्षवेधी ठरतात आणि त्यांना पुरस्कारही मिळतात.
हेही वाचा - मंत्री झाल्यावर प्रथमच अमित देशमुख लातुरात; कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत
देवणी जातीच्या गोवंश पालनामुळे जळकोटच्या कुनकी गावचा देशात नावलौकीक आहे. मात्र, या पशू पालकांना या पशुंचा सांभाळ करताना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात देवणी गोवंश संवर्धन करणाऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. 10 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे झालेल्या आढावा बैठकीत बनसोडे यांनी देवणी गोवंश हे मराठवाड्याचे भूषण आहे, या देवणी गोवंशाचे संवर्धन होण्यासाठी शासन स्तरावरून निर्णय घेणे गरजेचे असल्याचे म्हटले. उदगीरच्या पशू महाविद्यालय परिसरातील 100 एकर जमीन तर शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी बनसोडे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली असता मुख्यमंत्र्यांनी याला तात्काळ मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
हेही वाचा - बोरसुरी अवैध दारू विक्री प्रकरण; सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरुंदकर यांची बदली
या निर्णयामुळे देवणी गोवंश पालक खूप समाधान व्यक्त करत आहेत. दिवसेंदिवस देवणी गोवंशाची ओळख कमी होत चालली आहे. मात्र, देवणी गोवंश संवर्धन केल्यास देवणी जातीच्या गोवंशाचे जगात निर्मिती होईल. त्यामुळे पशूपालन करणाऱ्या पशूपालकांना चांगला आधार मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आणि पशूपालकांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे.