लातूर - सात दिवसांच्या विश्रांतीनंतर आज (बुधुवार) पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. या पूर्वीचा पाऊस हा मान्सूनपूर्व असला तरी आज बरसलेल्या सरी या मान्सुनच्याच असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यानंतर पेरणीबाबत बळीराजा द्विधा मनस्थितीत होता. मात्र, बुधवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता चाढ्यावर मूठ धरली जाणार हे नक्की.
अनियमित आणि अनिश्चित स्वरूपाचा असलेल्या मान्सूनने यंदा वेळीच आगमन केले आहे. यापूर्वी झालेला पाऊस हा निसर्ग वादळामुळे झाला होता. त्याबाबत निश्चितता नसल्याने पेरण्या झाल्या नव्हत्या. मात्र, शेती मशागतीची कामे पूर्ण झाली होती. आता पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या होतील असा अंदाज वार्तवला जात आहे. जिल्ह्यात खरिपात सोयाबीन हे महत्वाचे पीक आहे. त्यानुसार, आता बियाणे आणि खताचा पुरवठा होणार हा प्रश्न कायम आहे. कारण मागणीनुसार बियाणांचा पुरवठा झाला नसल्याने शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांचा वापर करण्याचे आव्हान केले होते. बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने आता पेरणीची लगबग सुरु होणार हे निश्चित. सायंकाळी ६ च्या दरम्यान सुरु झालेला पाऊस रात्री ७ पर्यंत सुरु होता. यंदा प्रथमच मशागतीची कामे उरकताच वेळेत पाऊस झाल्याने सर्व काही वेळेत होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.