लातूर : लातूरच्या औसा तालुक्यातील हासेगाव येथील सेवालायात मागील अनेक वर्षापासून HIV : Happy Indian Village ही संकल्पना राबवली जात आहे. आम्ही सेवक संस्थेच्या माध्यमातून मागील १६ वर्षात सेवालयाच्या जडणघडणीपासून ते 'हॅपी इंडियन व्हिलेज' साकारण्यापर्यंतचा प्रवास संघर्षमय आहे. या संघर्षाच्या काळात प्रसारमाध्यमांनी सेवालयाला खूप मदत केली. त्यामध्ये 'ई-टीव्ही' चा सिंहाचा वाटा असल्याचं रवी बापटले यांनी सांगितलं.
मृत्यू समोर असताना जगणं वेदनादायी : रवी बापटले म्हणाले की, आयुष्य समोर असताना जगणं खूप चांगलं पण मृत्यू समोर असताना जगणं हे वेदनादायी असतं. इथली मुलं दररोज मुठभर गोळ्या खाऊन मृत्यूशी झुंज देत जगत असतात. ही झगडणारी मुलं माझ्या आयुष्यात आली हे माझं सौभाग्य आहे. वयाच्या १८ वर्षानंतर मुलांचं संगोपन करणारी एकही संस्था देशात उपलब्ध नसल्यानं मुलांसाठी 'संगोपन' या संकल्पनेतून साकारलेलं सुरुवातीचं सेवालय मुले १८ वर्षाची झाल्यानंतर 'हॅपी इंडियन व्हिलेज' मध्ये रुपांतरीत होते. शिवाय या मुलांचं पुनर्वसन करण्याच्या उद्देशानं सेवालयातील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवत त्यातून मिळणाऱ्या पैशातून सेवालय नजीक १५ एकर जागा विकत घेतली.
मूल जगेल तेवढे दिवस आनंदी ठेवणं : एचआयव्ही म्हणजे मृत्यू हे समीकरण असल्यानं जेवढे दिवस मूल जगेल तेवढे दिवस आनंदी ठेवणं हेच आमचं काम होतं. परंतु HIV वर औषधे मोफत उपलब्ध झाल्यानंतर मुलांचं आयुष्य वाढलं. आजही HIV पूर्णतः बरा होत नाही. पण या औषधांनी आयुष्य वाढतं हे मात्र नक्की. शिवाय २०१४-१५ मध्ये औषधे उपलब्ध झाल्यानं गर्भवती असताना आईला उपचार व जन्मल्यानंतर १.५ वर्षापर्यंत नवजात बाळाला उपचार केल्यानं बाळ HIV Negative जन्माला येतं. हा प्रयोग हॅपी इंडियन व्हिलेजमध्ये यशस्वी झाला आहे. नुकतीच येथील २३ दांपत्याची लग्नं झाली असून त्यांच्या पोटी जन्मलेली १६ अपत्यं ही HIV Negative आहेत. सुप्रसिद्ध अभिनेता नागराज मंजुळे यांनी 'हॅपी इंडियन व्हिलेज'ला भेट दिली. त्यांच्या मराठी ' केबीसी' मध्ये रवी बापटले यांना निमंत्रित केलं आणि आता बिग बी अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात हॅपी इंडियन व्हिलेजला २६ लाख रुपये एवढी रक्कम प्राप्त झाली.
'हॅपी इंडियन व्हिलेज' पुनर्वसन प्रकल्प : HIV सोबत लैंगिकता जोडली जाऊन चारित्र्यावर संशय घेतला जातो. समाजात त्याबद्दलची जी नकारात्मकता आहे. ती कमी करण्यासाठी सेवालयात HIV म्हणजेच Happy Indian Village हे नाव देऊन पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सेवालयातील मुलांचे सामूहिक विवाह सोहळे करत त्यांचेही पुनर्वसन या ठिकाणी करण्यात येत आहे. हे व्हिलेज भूषणावह असू शकत नाही, कारण समाजामध्ये वाढलेल्या चंगळवादाचं हे प्रतिक आहे. हॅपी इंडियन व्हिलेज आणि सेवालय यासारख्या संस्था बंद पडून आपला भारत देश HIV मुक्त व्हावा हेच ध्येय असल्याचं हॅपी इंडियन व्हिलेजचे प्रमुख रवी बापटले यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं आहे.
हेही वाचा :