लातूर- हातावर पोट असणाऱ्या भाजीपाला आणि फळविक्रेत्यांना अद्यापही विक्रीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. लॉकडाऊनच्या काळात शहरातील गंजगोलाई येथे होणारी विक्री जिल्हा प्रशासनाने बंद केली आहे. मात्र, यावर कोणताही पर्याय दिला नसल्याने या विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळेच हातगाडा धारकांनी स्वतःच्या गळ्यात भाजीपाला, फळे आणि बांगड्याचा हार घालून मनपाच्या अधिकाऱ्यांसमोर ठिय्या मांडला. हातगाड्यावर भाजीपाला विक्रीला परवानगी द्यावी अन्यथा पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा- 'द क्रू ड्रॅगन' अंतराळयान यशस्वी पोहोचले अंतराळ स्थानकात
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि शहरातील गजबजलेल्या ठिकाणची गर्दी कमी करण्यासाठी हातगाडे रस्त्यावर लावू नयेत, असा नियम जिल्हा प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे गंजगोलाई या ठिकाणी होणारी गर्दी कमी झाली होती. मात्र, लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात तरी नियमात शिथिलता देत हातगाड्यावर भाजीपाला, फळे आणि बांगाड्यासारखे व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल असा आशावाद होता या व्यवसायिकांचा होता. मात्र, याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. दोन महिन्यांपासून खरेदी विक्री बंद आहे. त्यामुळे जगावे कसे असा सवाल या व्यावसायिकांसमोर उपस्थित झाला आहे.
मोठ्या उद्योग व्यावसायिकांना सूट आणि सर्वसामान्यांची लूट असा प्रकार सुरू असल्याचे भाजीपाली व्यवसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी त्यांनी ठिय्या मांडला. काही दिवस या व्यावसायिकांचे गाडे हे पोलीस ठाण्यात, मनपाच्या आवारात होते. मात्र, आता जिल्हा प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी या व्यावसायिकांनी केली आहे.