लातूर - शहरासह उदगीर तालुक्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील रुग्णांची संख्या आणि लगतच्या तालुक्यांचा विचार करता या ठिकाणी कोरोना टेस्टची प्रयोगशाळा उभारणे आवश्यक आहे. या करिता आरोग्य विभागाने प्रस्ताव पाठवावा. शासन स्तरावर पूर्तता केली जाणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे. उदगीर, जळकोट, देवणी या तालुक्यातील वाढती रुग्णांची संख्या पाहता उपाययोजना संदर्भात रविवारी आढावा बैठक पार पडली.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण हा उदगीर येथेच आढळून आला होता. शहरात एकूण रुग्णांची संख्या 621 एवढी झाली आहे. उदगीर येथे सामान्य रुग्णालय असून लातूर पाठोपाठ या ठिकाणच्या रुग्णालयात कोरोना रुग्ण दाखल केले जात आहेत. त्यामुळे शहरासह लगतच्या तालुक्यातील रुग्णांची संख्या पाहता येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली. वाढती रुग्णसंख्या पाहता विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा उभारण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग आणि प्रशासनाने प्रस्ताव पाठवावा. त्याला मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री यांनी दिली आहे. 621 रुग्णापैकी आतापर्यंत येथील सामान्य रुग्णालयात 34 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मृत्यू दरही जास्त असल्याने आरोग्य यंत्रणेने हा दर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी देशमुख यांनी दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांची उपस्थिती होती.
लातूर शहरात रॅपिड टेस्टची संख्या वाढविण्यात आली आहे. त्याच प्रमाणे उदगीर शहरातही टेस्टची संख्या वाढविण्यात यावी. या करिता लॉकडाऊनमध्ये वसूल झालेल्या दंडाच्या रकमेचा वापर केला जाऊ शकतो. तसेच 14 व्या वित्त आयोगातूनही रॅपिड टेस्ट किटची खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील स्कूल बसचे रूपांतर रुग्णवाहिकेत करावे तसेच रॅपिड टेस्ट वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.
सध्या उदगीर तालुक्यात 135 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 452 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर बसवराज पाटील, कल्याण पाटील, राजेश्वर निटूरे यांनी सामान्य रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळ, सीटीस्कॅन मशीन बंद शिवाय रुग्णालयातील अस्वच्छता या सारख्या समस्या पालकमंत्री यांच्यासमोर मांडल्या.