लातूर - प्रत्येक गावाला यात्रेची परंपरा असतेच.. त्याचप्रमाणे चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे पण यात्रा महोत्सव असतो, पण तो व्याधीग्रस्तांचा.. हो वनस्पतीचा खजिना असलेल्या या संजीवनी बेटावर उत्तर नक्षत्रात ही यात्रा भरते. मात्र, यंदा या ऐतिहासिक यात्रेवरही कोरोनाचे संकट आहे. यात्रेदरम्यानच्या तीन दिवसात येथील वनस्पतीचे सेवन केल्यावर कोणताही आजार बरा होतो अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच या बेटाला संजीवनी बेट म्हणून ओळखले जात आहे.
कोणत्याही यात्रेला परंपरा आणि ऐतिहासिक महत्व असते. पण चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील संजीवन बेटावरील यात्रेचे वेगळेपण आहे. हनुमान जेव्हा द्रोणागिरी पर्वत घेऊन उत्तरेकडून दक्षिणीकडे निघाले होते. तेव्हा या पर्वताचा एक तुकडा हा चाकूर तालुक्यातील या वडवळ नागनाथ येथे पडला होता. त्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती असून त्याचा उपयोग विविध व्याधींवर केला जातो. त्यामुळेच या बेटाला संजीवन बेट म्हणून संबोधले जात आहे. उत्तर नक्षत्रात या ठिकाणी विविध व्याधींनी त्रस्त असलेले नागरिक येतात आणि तीन दिवस केवळ वनस्पतींचे सेवन करतात. त्यामुळे आजार बरे होतात अशी आख्यायिका आहे.
हेही वाचा - कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या, पीकविम्यासाठी मुदत वाढविण्याची मागणी
दरवर्षी या काळात हजारो भाविक या निसर्गरम्य वातावरणात येत असतात. परंतु, यंदा कोरोनाच्या संकटामुळे भाविकांची संख्या घटली आहे. या बेटावर महादेव मंदिर, हनुमान मंदिर एवढेच नाही तर देवीचे मंदिरही आहे. बेटाचे तीन टप्पे आहेत. सर्वात उंच, मध्यभागी आणि पर्वताचा पायथा अशा तिन्हीही ठिकाणच्या वनस्पती चाखल्यास आजार बरा होतो. विशेष म्हणजे या तीन दिवसांच्या काळात जेवण न करता या वनस्पती खाव्या लागतात. त्यामुळे कोणत्याही व्याधी दूर होतात असेही सांगितले जाते. या आगळ्या वेगळ्या घटनास्थळाला आतापर्यंत अनेकांनी भेटी दिल्या आहेत. या बेटाला पर्यटनचा दर्जा मिळाला आहे.
दोन वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार संभाजी पाटील-निलंगेकर हे देखील बेटावर आले होते. या ठिकाणी संशोधन केंद्र, आयुर्वेदिक महाविद्यालय, कायमस्वरूपी पाणीपुरवठा करून बेटाचा सर्वांगीण विकास केला जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ही आश्वासने हवेतच आहेत. प्रत्यक्षात बेटावर जाण्यासाठी साधा रस्ताही झालेला नाही. पर्यटनाच्या योजना केवळ कागदावरच असून मूलभूत सोई-सुविधाही नाहीत हेच वास्तव आहे.
त्याप्रमाणात या संजीवन बेटाचे महत्व सांगितले जात आहे. त्या तुलनेत या ठिकाणी सुविधा नाहीत. केवळ विकासाच्या गप्पा न करता प्रत्यक्षात या बेटाचा विकास व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - लातूर : सिद्धेश्वर मंदिर परिसरात अज्ञातांकडून तरुणाचा खून