लातूर (निलंगा) - ग्रामीण भागातील मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना आता तोंडाला मास्क बांधूनच घराबाहेर पडावे लागणार आहे, अन्यथा ग्राम पंचायत दंडात्मक कारवाई, अशी माहिती दवंडीच्या माध्यमातून गावागावात दिली जात आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी १५ जुलै ते ३० जुलैपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
लॉकडाऊनचे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सक्तीने पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देताच संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत दवंडी पिटण्यात आली. या दंवडीमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे जाहीर वाचन केले जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. निलंगा तालुक्यातील ६ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपासून सर्व व्यवहार, व्यवसाय आणि बँका बंद राहणार असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर ग्रामपंचायत प्रशासन दंडात्मक कारवाई करणार आहे, अशा सूचना गावांतील गल्ली बोळात जाऊन दिली जात आहे.
दरम्यान, पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनंतर कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तोडण्यात यश येईल, असा प्रशासनाचा मानस आहे. शहरासह ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.