लातूर - मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावर माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर आता राजकीय पुढाऱ्यांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या बांधाकडे वळवला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे यांनी जिल्ह्यातील उदगीर आणि जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
यादरम्यान, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे गोविंद यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे, आज ते एक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यावेळी सरसकट शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी यासाठी ते विनंती करणार आहेत.
फडणवीस हे शेतकऱ्यांना भरभरून मदत करणारे व्यक्ती आहेत. त्यामुळे, मला पूर्ण विश्वास आहे की ते सरसकट शेतकऱ्यांना मदत करतील असा विश्वास गोविंद केंद्रे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिला आहे.
सर्वत्र पाऊस सारखाच झाला आहे. यात सर्वच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे, सरकारने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करत बसण्याऐवजी सरसकट शेतकऱ्यांना मदत दिली, तर अटींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना लागत असलेला खर्च टळेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हेही वाचा : तुमचा शपथविधी राहु द्या, मदतीचे काय? गिरिश महाजनांना शेतकऱ्यांचा घेराव